
जळगाव, दि. 4 (जनसंवाद न्युज): बागवान मोहल्ला परीसर, जोशीपेठ भागात रस्त्यावरील गटारीचे पाणी गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर येत आहे. वारंवार निवेदन देवून देखील यावर कुठलीच कारवाई झालेली नसल्याने अशफाक बागवान यांच्या नेतृत्वात बुधवारी महानगर पालिकेसमोर परीसरातील नागरीकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बागवान मोहल्यातील बॉम्बे हार्डवेअर जवळील रस्त्यावरील गटारीचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर व सर्वत्र वाहत असून त्यामुळे रोगराईची प्रचंड समस्या निर्माण झालेली आहे. तसेच नागरीकांना ये जा करणेसाठी देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
त्या ठिकाणी शाळकरी मुलांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांचे बुट व मोजे गटारीच्या पाण्यात भिजतात व त्यामुळे त्यांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या बाबत अनेकदा निवेदने देवून सुध्दा अद्याप पावेतो गटारीचे बांधकाम करणेत आलेले नाही. याबाबत वारंवार अर्ज करून देखील आज पावेतो कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे परिसरात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे व नागरीकांचा मनात प्रशासनाविषयी चिड निर्माण झालेली आहे. परिसरात नागरीकांना जिवन जगणे असय्य झाले आहे. वारंवार दिलेल्या अर्जाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे परीसरातील नागरीकांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
मागण्या खालील प्रमाणे
१. जोशी पेठ, बागवाण मोहल्ला परिसरातील कॉक्रीटीकरण झालेले रोड संपूर्ण जीर्ण झालेले असल्यामुळे नविन बांधून मिळावेत.
२. जोशी पेठ, बागवाण मोहल्ला परिसरातील आडवी गटार सरळ करून मिळावी व गटारीवर ढापे टाकून मिळावेत
३. नगरपालिकेचे लाईट, पथदिवे पूर्ण परिसरात सुरळीत करून मिळावे व जीर्ण झालेले खांब बदलून मिळावे.
४. परिसरात सफाई करणारे कर्मचारी वाढवून मिळावेत व नियमित साफसफाई करणेत यावी.
५. बॉम्बे हार्डवेअर समोरील गटारी ही अरूंद केलेली आहे त्याची रूंदी वाढवून मिळावी.
६. ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नसताना इंजिनीअरने काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले त्या इंजिनीअरला निलंबित करावे.