
बदलापूर, दि. 23 (जनसंवाद न्युज): येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले.
बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्या प्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. मात्र या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. यासंदर्भात चौकशी करण्याकरिता त्याला नेण्यात येत होतं. त्यावेळी त्याने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही स्वरक्षणार्थ त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्याचा मृत्यू झाला आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शरद पवार काय म्हणाले
बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.
कोण आहे अक्षय शिंदे?
आरोपी अक्षय शिंदेने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकारचे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. ज्या शाळेत ही घटना घडली, ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे.