
जळगाव, दि.21(जनसंवादन्युज): शहरातील राजमालतीनगरातील रहिवासी सिद्धार्थ माणिक वानखेडे यांचा सुरत रेल्वे मार्गावरील फाटक जवळ झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या मागणीनुसार मृताचे वैद्यकीय समितीच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, सिद्धार्थ वानखेडे यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांसह समाजबांधवांची मोठी गर्दी दिसून आली. सिद्धार्थ वानखेडे हे बुधवारी दि. 20 रोजी मतदान केंद्रावरून परत येत असताना रेल्वे फाटकाजवळ त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात सिद्धार्थचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी त्याच्या कुटुंबीयांनी जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या आवारात काल दिवसभर ठिय्या आंदोलन केले. मात्र, या खुनातील प्रमुख सूत्रधार माजी नगरसेवक राजू पटेल व त्याचे साथीदार मिळून आले नाहीत. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात संशयित राजू बिस्मिल्ला पटेल, संजू पटेल, मेहमूद पटेल, आवेश पटेल, जस्मीन पटेल, जानू ऊर्फ रेहान पटेल अशा सहा संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सिद्धार्थवर बायपास शस्त्रक्रिया झाल्याची माहिती असताना हल्लेखोरांनी त्यांच्या छातीवर लाकडी दांडक्यांनी हल्ला चढविल्याने अंतर्गत दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुटुंबीयांच्या मागणीनुसार वैद्यकीय समितीच्या समक्ष त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी दोनला मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.
कडेकोट पोलिस बंदोबस्त
खुनाची घटना घडल्यानंतर जळगाव शहर पोलिसांतर्फे राजमालती नगरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी झाल्याने ‘एमआयडीसी’ सह जिल्हा पेठ पोलिसांसह अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर राजमालती नगरातून सिद्धार्थ वानखेडे यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्यविधीसाठी नातेवाईकांसह परिसरातील रहिवासी व समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.