
जळगाव, दि. २९ (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने परीक्षेचे कामकाज सांभाळणाऱ्या महाविद्यालयनीन प्राध्यापकांसाठी ताण-तणाव मुक्त / कॉपी मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा दि. ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण-तणाव येवु नये व परीक्षेला सामोरे जातांना कोणती काळजी घ्यावी जेणे करुन कॉपीमुक्त परीक्षा देणे विद्यार्थ्यांना सोईचे होईल यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक महाविद्यालयात परीक्षेचे कामकाज सांभाळणाऱ्या एका प्राध्यापकास या कार्यशाळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण घेणाऱ्या प्राध्यापकांनी आपल्या महाविद्यालयात जाऊन ताण-तणाव मुक्त / कॉपी मुक्त परीक्षा अभियान याबाबत व्याख्याने आयोजित करुन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा या कार्यशाळेचा हेतू आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने संचालक डॉ.जयंत लेकुरवाळे यांनी महाविद्यालयांना पत्र पाठवीले असून दि. ३ सप्टेंबर पासून प्राचार्याकडून प्राध्यापकांची नावे मागविली आहेत.बुधवार दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या अभिसभा सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.