संत चोखामेळा वसतीगृहातील भन्ते एन. सुगतवंस महाथेरो यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव, दि.१२ (जनसंवाद न्युज): संत चोखामेळा वसतिगृहाच्या माध्यमातून धम्म कार्यासोबत समाजकार्य आणि शिक्षणकार्य करणारे भदंत एन. सुगतवंस महाथेरो यांचे गेल्या ८ मार्चला निर्वाण (निधन) झाले. त्यांच्यावर मंगळवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांनी ५८ वर्षे जळगाव जिल्ह्यात धम्म प्रसार आणि प्रचाराचे कार्य केले. मंगळवारी सकाळी नऊला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वेस्थानकापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. हजारोच्या संख्येने उपासक उपासिका अंत्यसंस्काराला उपस्थित होत्या. धम्मगुरूंच्या आठवणींमुळे संपूर्ण समुदाय भावूक झाला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा जात असताना, जळगाव महापालिकेच्या सहकार्याने रस्ते पाणी टाकून स्वच्छ करण्यात आले. ‘बुद्धमं सरणम् गच्छामि’च्या शांत स्वरात महाप्रयाण यात्रेला प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या वाहनात भन्तेचे पार्थिव ठेवण्यात आले होते. दीपधूप आणि सुगंधी द्रव्याने सारा मार्ग पवित्र करण्यात आला.
पार्थिव असलेल्या वाहनासमोर भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच श्रीलंकेवरून शेकडो भन्ते गण रांगेने चालत होते. मागे सर्व महिला उपासिका दोन दोनच्या रांगेने शांततेत व शिस्तीत चालत होत्या. पाठीमागे सर्व उपासक भन्तेंना अखेरचे वंदन करीत चालत होते.
संत चोखामेळा वसतिगृह परिसर प्रांगणात पार्थिव पोहोचले. तेथे भन्ते संघाने धम्म संस्काराला सुरुवात केली. भदंत आनंद महाथेरो, भदंत पय्यादीस महाथेरो, भदंत धम्मबोधी धेरो, भदंत संघरत्न या प्रमुख भन्ते संघाचे मनोगत झाले.