
जळगाव, दि.13 (जनसंवाद न्युज): जिल्ह्यात अनेक वर्षांपासून ‘महाआयटी’च्या माध्यमातून आधार कार्डशी संबंधित कामे केली जात आहेत. नियमानुसार सर्व प्रक्रिया आधार केंद्र संचालकांकडून करण्यात येत आहे. आताही ‘महाआयटी’ या महाराष्ट्र राज्याच्या शासकीय संस्थेमार्फतच आधार नोंदणी सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दि.13 रोजी शहरासह जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र संचालक असोसिएशनच्या जिल्ह्यातील केंद्रचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
संघटनेचे अमोल पठार, विजय सोनवणे, अमर येवले, मनोज निंबाळकर, राजू सोनवणे, किशोर रायसिंगे, महेंद्र पोतदार, तन्मय तायडे, सागर चौधरी, जगदीश तायडे, सोनु तायडे, संजय खैरनार, शब्बीर सैय्यद,आदी यावेळी उपस्थित होते.
नवीन कंपन्यांद्वारे केंद्रीय कंपन्या नवख्या ऑपरेटरला कामावर ठेवत आहेत आणि त्यांच्याकडून बँक गॅरंटी व्यतिरिक्त एक लाख डिपाझिट घेत आहेत. नव्या ऑपरेटरकडे अनुभवाचा अभाव आहे. यामुळे ऑपरेटर निलंबित होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कंपनी पुन्हा नवीन ऑपरेटरकडे आधार कीट देते. महाआयटी लिमिटेड, जी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत आहे, ही ‘व्हीएलई’ची १०० टक्के हिस्सेदारी मानणारी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारी संस्था आहे. याउलट, नवीन कंपन्या आधार अपडेट फी मधील ५० टक्के हिस्सा स्वतःकडे ठेवतात, ज्यामुळे व्हीएलई (व्हिलेज लेव्हल इंटरप्रायजेस) व ऑपरेटरच्या उत्पन्नावर परिणाम होतो. नवीन कंपन्यांच्या धोरणांमुळे आमच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ‘आधार’शी संबंधित काम महाआयटी लिमिटेडमार्फतच देण्यात यावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.