जैन साधू-संतांच्या पदयात्रेत पोलीस संरक्षण मिळणार
राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक देवेन भारतींचे आदेश

जळगाव, दि. 14 (जनसंवाद न्युज): जैन साधू-संताच्या पदयात्रेवेळी होणारे अपघात, होणारे हल्ले टाळण्यासाठी त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक देवेन भारती यांनी दिलेले आहेत.
राज्यात जैन साधू-संतांची पदयात्रा काढण्यात येते. त्यावेळी महामार्गावर काही अपघात होतात तर काही ठिकाणी असंतुष्ट सामाजिक घटकांकडून जैन साधू-संतांवर हल्ले करण्यात येतात. त्यामुळे सर्व पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जैन साधू-संतांचा दौरा असेल त्यावेळी आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे देवेन भारती यांच्या आदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनीही अशा आदेशाचे पत्र काढले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे या विषयाची मागणी विधानपरिषद सदस्य आमदार सत्याजित तांबे यांनी केली होती. तसेच युवासेनेचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनीही यासाठी प्रयत्न केले होते.