
जळगाव, दि.13 (जनसंवाद न्युज): शहरातील सर्व डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकारांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भेटून महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात निवेदन दिले. दि.10 डिसेंबर मंगळवार रोजी पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता आणि त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले होते. त्यानंतर जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन विक्रम कापडणे यांनी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात तक्रार नोंदवलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला. या घटनेचा पत्रकार तीव्र निषेध करत असून सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी एबीपी माझाचे चंद्रशेखर नेवे, TV9 चे किशोर पाटील, न्युज18 लोकमतचे विजय वाघमारे, पुढारी न्युज चॅनेलचे सचिन गोसावी, साम टिव्हीचे संजय महाजन, मटा डिजिटलचे निलेश पाटील, जनसंवाद न्युजचे संधिपाल वानखेडे, लोक टाईमचे विक्रम कापडणे, जनता लाईव्हचे सतीश सैंदाणे, जळगाव हेडलाईन्सचे सोनम पाटील, धाडस महाराष्ट्रचे विकास पाथरे, सिटी महाराष्ट्रचे योगेश चौधरी, सत्यमेव जयतेचे दिपक सपकाळे, श्री न्युजचे चेतन पाटील, हॅलो जनताचे प्रमोद रूले, सीआय न्युजचे राजेंद्र निकम, अमोल कोल्हे, अनिल राठोड आदी पत्रकार उपस्थित होते.