
जळगाव, दि. 5 (जनसंवाद न्युज): गिरणा पंपिंग प्लांटमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाईप चोरणाऱ्यांना मनपा कर्मचाऱ्यांनी रंगहाथ पकडले होते. यातील सहावे संशयित महानगर पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते सुनिल सुपडू महाजन यांचा पोलिसांडून शोध घेतला जात आहे. त्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.
शहरालगत असलेल्या गिरणा पंपिंग प्लांटमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप जेसीबीद्वारे काढून नेताना २ डिसेंबर रोजी मनपा कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अटक करण्यात आलेल्या संशयितांची चौकशी केल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबात हे पाईप काढण्याचे काम सुनिल महाजन यांच्या सांगण्यावरुन करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार या गुन्ह्यात त्यांचा देखील समावेश असल्याचे समोर येताच पोलिसांनी सहावे संशयित म्हणून सुनिल महाजन यांचे नाव वाढविले होते. त्यामुळे संशयितांची संख्या ही सहावर पोहचली होती.
या गुन्ह्यात सुनिल महाजनांचे नाव समोर येताच तालुका पोलिसांसह एमआयडीसी पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक मंगळवारी दोन वेळा त्यांच्या घरी देखील जावून आले. मात्र महाजन हे मिळून आले नाहीत.
संशयितांनी दिलेल्या जबाबात सुनील सुपडू महाजन यांचे नाव समोर येताच ते पसार झाले आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील महाजन हे मिळून आले नसल्याने तालुका पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.