
जळगाव, दि.३ (जनसंवाद न्युज): गिरणा पंपिंगवरून जळगाव शहरासाठी पाणीपुरवठा करणारी ब्रिटिशकालीन लोखंडी पाइपलाइन जेसीबी लावून चोरून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संशयितांना घटनास्थळावरून पकडले. आता संशयितांच्या जबाबात माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात चौकशी करीत असताना, संशयिताने नाव घेतल्यावरून सुनील महाजनांचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांनी दिली.
गिरणा पंपिंग स्टेशनवरून शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी बिड धातूची पाइपलाइन टाकली होती. गिरणेचे पाणी कमी पडत असल्याने आणि त्याच काळात वाघूर प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून ही पाइपलाइन होती त्याच स्थितीत जमिनीत आजही आहे. सावखेडा शिवारात आर्यन पार्कसमोरील चौधरी यांच्या शेतात एक जेसीबी खोदकाम करीत असताना, रस्ते तयार करणाऱ्या कंत्राटदाराला आढळून आले. त्याने महापालिकेचे उपअभियंता योगेश बोरोले यांना माहिती दिली. तत्काळ श्री. बोरोले यांनी परिसरातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना पाठवून खात्री केली. काही वेळात बोरोलेंसह इतर अधिकारी दाखल झाले असता, जेसीबीचालक रवण चव्हाण जमिनीतून पाइप काढत असल्याचे आढळून आले. त्याला विचारपूस केल्यावर त्याने अक्षय अग्रवाल यांच्या सांगण्यावरून पाइप काढून नेत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात अक्षय अग्रवाल घटनास्थळावर दाखल झाल्यावर प्रकरणाचा उलगडा होऊन बोरोले यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी चौकशीअंती सहा संशयितांची नावे निष्पन्न केली.
गुन्ह्यातील संशयित
अक्षय मनोज अग्रवाल (वय ३०, रा. भवानी पेठ), रोहन किशोर चौधरी (२३, शिरसोली), भावेश पाटील (२०), अमीन सलीम राठोड (३५, मेहरूण) या चौघांना अटक करून मंगळवारी न्यायाधीश एम. एम. बढे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तीन दिवस कोठडीची मागणी केली. मात्र, बचाव पक्षाने त्यांची मागणी खोडून काढली. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर संशयितांची २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी काम पाहिले. माजी महापौर पती सुनील सुपडू महाजन पोलिसांना मिळून आलेले नाहीत, तर नरेंद्र वामन पानगडे (२१) याचा पाय फॅक्चर झाल्याने त्यास कायदेशीर प्रक्रियेअंती नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
गुन्ह्याचा तपास पूर्वी सहाय्यक फौजदार अनिल फेकडे यांच्याकडे होता. गुन्ह्यात माजी महापौर पतीचे नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी गुन्ह्याचे गांभीर्य पाहता या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे यांना सोपविला आहे. दाखल गुन्ह्यात न्यायालयात इतर संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचीही माहिती समोर आली आहे.