जळगावात रंगला दिवाळी पहाट…” स्वर सोहळा ” भक्तिमय कार्यक्रम…! ; स्वररसात चिंब न्हाऊन निघाले रसिक-श्रोते..!!

जळगाव, दि. 1 (जनसंवाद न्युज): लखलखत्या तेजाचा उत्सव असणाऱ्या दिवाळीच्या प्रारंभी रसिकांसाठी शब्दस्वरांची अनोखी मैफील जळगावात चांगलीच रंगली.. ! दिवाळी म्हटली की ,आनंद. उत्साह.. अन जल्लोष ..सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई..!संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वर स्वरांनी झाले तर बातच न्यारी..! ‘ सुबोनियो ‘ परिवारातर्फे दिवाळी पहाट ही सूर सुमनांची सुरेल उधळण आज झाली…या सांगीतिक मैफिलीचे उदघाटन युवा उद्योजक सुमोल सुबोधकुमार चौधरी आणि सृष्टी चौधरी या दाम्पत्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले..याप्रसंगी उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते सुबोध चौधरी , सुनिल चौधरी, सुयोग चौधरी, अरुण बऱ्हाटे, हिरा खडके , राजू शेठ खडके,अपर्णा चौधरी, यांच्यासह बालकिसन झंवर , संध्या सरोदे,सुधीर नारखेडे आदींची उपस्थिती होती.
आज रसिक श्रीतेही दिवाळी पहाट या कार्यक्रमाला हजर असणे मानाचे मानतात..काहींनी तर पारंपारिक पोशाख परिधान केल्याने एकूणच वातावरणात एक वेगळं चैतन्य भरलं गेलं.. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन ,संकल्पना आणि बहारदार निवेदन कलावंत आणि ऑर्केस्ट्रा सेव्हन स्ट्रिंग्सचे संचालक तुषार वाघुळदे यांनी करून भक्तिमय संगीत मैफिल चांगलीच रंगविली.श्री.वाघुळदे यांनी आपल्या विशेष व खुमासदार शैलीत केलेल्या निवेदनाचे मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.. संपूर्णपणे मराठी ” फील ” देणारी तसेच भारावलेली अशी ही पहाट रसिक श्रोत्यांच्या आयुष्यात अविस्मरणीय राहील.. सांगीतिक कार्यक्रमाने दिवाळी पहाट खुलवण्याची पद्धत आज सर्वदूर रूढ झाली आहे. ‘दिवाळी पहाट’ म्हणजेच दीपोत्सवादरम्यान सकाळी-सकाळी आयोजित होणारा देखणा भक्तिमय कार्यक्रम…! अनेक वर्षांपासून जळगाव शहराला सांस्कृतिक-संगीत- कलाविषयक कार्यक्रमाची परंपरा सुरु आहे. या दिवशी लोक.. सांस्कृतिक रुपाने एकत्र येत मराठी भक्ती आणि भावगीतांचा आनंद घेतात. हा आनंद शहरातील लोकांना आणि दिवाळीचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी होत असतो.
श्रोत्यांसाठी ही दिवाळी पहाट उत्साहाची असते,आनंदाची असते.तशीच या मैफिलीत सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी उत्साहाची आणि कसोटीची असते..विविध गाजलेली प्रसिद्ध भक्तिगीते ,भावगीते ,अभंग आणि गवळण सादर झाल्यात.यात गणराज रंगी नाचतो, ओमकार स्वरूपा,कानडा राजा, माझे माहेर पंढरी , अभीर गुलाल उधळती, निघालो घेऊन दत्ताची,
,चला जाऊया जेजुराला
,सावळे सुंदर…रूप मनोहर…
, ऐरणीच्या देवा तुला,मोगरा फुलला…
, केव्हा तरी पहाटे…
, सत्यम शिवम सुंदरम, मै तुलसी ‘तेरी आंगण की..,
आली माझ्या घरी दिवाळी,मधूबन मे राधिका नाचे रे…मन लागो रे..
, दीपावली मनाई सुहानी…मेरे साईके हाथो मे जादू का पानी..
, शुक्रतारा मंदवारा
,भोले ओ भोले…
बाजे मुरलीया बाजे
, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा…
, केशवा माधवा तुझ्या नामात…, सुखाचे ते सुख,सावळा नंदाचा – गवळण
, ललाटी भंडारा
,पाहिले मी तुला… तुज मागतो मी आता. ,रुपेरी वाळूत माडाच्या बनात..विठ्ठल नामाचा टाहो,हरी म्हणा..आदी सरस गाणी सादर झालीत.. दि.1 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजल्यापासून तर नऊ वाजेपर्यंत जळगावातील श्री कालिका माता मंदिरा समोर ,एच.डी.एफ.सी बँकेशेजारील प्रांगणात ” दिवाळी पहाट ” सूर सुमनांची सुरेल उधळण…! हा कार्यक्रम चांगलाच रंगला आणि प्रेक्षकांनी सातत्याने टाळ्यांचा वर्षाव केला.
या माध्यमातून एकजुटतेचा आनंद साजरा करण्याच्या विचारातूनच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दिवाळी पहाट सारख्या अनोख्या मैफलीत सुपरिचित कलाकार व सुप्रसिद्ध निवेदक – कलावंत तुषार वाघुळदे , वैशाली पाटील ( शिरसाळे ), डॉ.गिरीश पाटील ,ज्ञानेश्वर पाथरवट ,मयूरकुमार ,विनायक रडे यांनी आपल्या गीतांमधून लोकांना मंत्रमुग्ध केलं. तर शुभम चव्हाण , अमोल देवरे , नितीन पाटील , सर्वेश चौक, नेहा राणे , श्रावणी सरोदे यांची साथसंगत लाभली. या मैफिलीचे निवेदन ,संकल्पना आणि संगीत संयोजन ऑर्केस्ट्रा सेवन स्ट्रिंग्सचे संचालक आणि ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे सचिव तुषार वाघुळदे यांचे होते. या शहरातील नागरिकांना प्रत्येक दिवाळीत अशा संगीतमय कार्यक्रमाची प्रतीक्षा व उत्सुकता असते. त्यांची गरज ओळखून ही सांगीतिक मैफिल झाली आणि सुमधुर स्वर सोहळ्याची मेजवानीच मिळाली.
6तसेच एकाहून एक सरस भक्तिगीत व भावगीते आणि अभंग,गवळण अशा गाण्यांमुळे सकाळचे आल्हाददायक आणि वातावरण चैतन्यमय व संगीतमय झाल्याचे दृश्य दिसून आले. मराठी संगीतात संस्कृती आणि परंपरेची झलक पाहायला मिळाली. दरवर्षी या परिवारातर्फे ” दिवाळी पहाट ” हा सुरेल संगीताचा कार्यक्रम होणार असल्याचे सुबोधकुमार शेवटी म्हणाले..आभार हिरा खडके यांनी मानले..शेकडो प्रेक्षकांनी या मैफिलीचा लाभ घेतला.