
नागपूर, दि.२२ (जनसंवाद न्युज): ‘महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपल्यावर भाजपने दबाव टाकला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात खोटे शपथपत्र लिहिण्यास सांगण्यात आले होते. त्यास नकार दिल्याने तुरुंगात टाकण्यात आले होते,’ असे आरोप यापूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत देशमुख डायरी ऑफ होम मिनिस्टर’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहेत. त्यातून अनेक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ते पुस्तकातून कोणाला लक्ष करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन मुंबईच्या पोलिस आयुक्तांना आरोप करायला लावले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात शपथपत्र लिहून देण्यास सांगण्यात आले असे देशमुख यांनी सांगितले होते. आता देशमुख हे नव्याने या वादाला तोंड फोडणार असल्याचे दिसून येते. विधानसभा निडवणुकीच्या दरम्यान ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर’ हे पुस्तक ते प्रकाशित करणार आहेत. यातून अनिल देशमुख १४ महिने तुरुंगात असताना किती षड्यंत्र रचले, कसा छळ केला हे सांगणार आहेत. तुरुंगात असताना अनेक वृत्तपत्राचे कात्रणे व अनेक संदर्भ त्यांनी गोळा केले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यावर या पुस्तकाला अंतिम स्वरूप दिले असून हे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच करणार आहेत.