जळगाववैद्यकीय

स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास वेळेवर उपचार शक्य, डॉ. गिरीश ठाकूर

जळगाव, दि. 17 (जनसंवाद न्युज) : स्तन कर्करोग ही महिलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य प्रकारची कर्करोगाची समस्या आहे. त्याचे सुरुवातीला निदान झाल्यास उपचार सोपे होऊ शकतात. म्हणून स्तन कर्करोगाची लक्षणे ओळखणे आणि नियमित तपासण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागातर्फे स्तन कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त विशेष उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यातून उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप अधिष्ठाता डॉ. रमेश वासनिक, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विश्वनाथ पुजारी उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे नोडल अधिकारी सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली. यानंतर शल्यचिकित्सा विभागाच्या निवासी विद्यार्थ्यांनी स्तन कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक नाटिका सादर केली.

नाटिकेतून, स्तन कर्करोगविषयी संदेश देण्यात आला. स्तन कर्करोगाची मुख्य लक्षणे हि स्तनात गाठ निर्माण होणे, त्वचेचा रंग बदलणे, स्तनात वेदना किंवा अस्वस्थता, स्तनातून स्त्राव येणे असे आहेत. विभागाच्या मदतीने ओपीडी क्रमांक ११६ येथे सर्व तपासण्या मोफत केल्या जात आहेत आणि तपासणीसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन उपलब्ध आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. सूत्रसंचालन डॉ. सुनील गुट्टे यांनी केले. आभार डॉ. शर्वरी कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी विभागातील प्राध्यापकांसह डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. अभिषेक उंबरे आदी विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button