
जळगाव, दि. 27 (जनसंवाद न्युज): सामाजिक न्याय दिनानिमित्त गुरूवार दि. 26 जुन रोजी ला. ना. शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला पुणे येथील यशदाचे राष्ट्रीय प्रशिक्षक नितीन पाटील, प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, विवेक वेलणकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरूवात करण्यात आली. मंचावर तीन ही मान्यवरांसह जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक कुमार गुप्ता व जवान फाउंडेशनचे अध्यक्ष ईश्वर मोरे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. महेंद्र चौधरी हे होते.
या कार्यशाळेला राज्यभरातुन सामाजिक कार्यकर्ते, नागरीक, पत्रकार, कर्मचारी मंडळी उपस्थित होते. सभागृह बर्यापैकी भरले होते. सुरूवातीला जवान फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी कार्यशाळेविषयी प्रस्तावना सादर केली. ते म्हणाले की 2019 ला सुध्दा अशाच प्रकारे कार्यशाळा घेण्यात आली होती. कार्यशाळेला पोलीस विभागाचे बरेच कर्मचारी उपस्थित राहिल्याने त्यांनी पोलीस खात्याचा गौरव करत इतर प्रशासकीय विभागातील कर्मचारी हजर न राहिल्याने त्यांनी खेद व्यक्त केला.
विवेक वेलणकर यांनी प्रेझेंटेशन सह समारोप करत माहिती मागवताना कशा अडचणी येतात आणि त्यावर कशी मात करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांकडुन काही शंका असल्यास प्रश्न मागवुन मंचावर उपस्थित मंडळींनी त्या प्रश्नावर सविस्तर उत्तर देत उपस्थितांचे समाधान केले. काही सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन पत्रकार अयाज मोहसिन यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपक कुमार गुप्ता यांनी केले.