वाचन ही माणूस समृद्ध करणारी बाब, नाट्यकलावंत हर्षल पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव, दि.27 (जनसंवाद न्युज): वाचन ही माणूस समृद्ध करणारी अतिशय महत्वाची बाब आहे. आपले व्यक्तित्व विकसित होण्यासाठी ललित आणि वैचारिक अशा दोन्ही पद्धतीच्या चांगल्या पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. असे मत नाट्यकलावंत हर्षल पाटील यांनी व्यक्त केले.
मूळजी जेठा (स्वायत्त), महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित ‘काय वाचावं? का वाचावं? या विषयावरील विशेष व्याख्यानप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत ते बोलत होते.
शिस्तबद्ध असणारी माणसे ज्यावेळेस सोबत असतात. त्यावेळेस वाचनाला देखील शिस्त येत असते. अशी माणसे वाचकाला दिशा देत असतात. पुस्तकातलं साहित्य कालबाह्य होत नसतं तर ते सदैव आपल्या सोबत असतं. पुस्तकंच आपले खरे सोबती असतात म्हणून पुस्तकांशी मैत्री करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. आधुनिक काळातील अनेक लेखकांच्या साहित्यकृतींचा संदर्भ देत त्यांनी अवांतर वाचनाचे महत्त्व सांगितले. जग समजून घेण्यासाठी पुस्तकं आपल्याला मदत करतात. ऊर्जा देतात असेही ते म्हणाले. विविध भाषांमधील उत्तम साहित्यकृती वाचण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, वाचनातून विद्वत्ता आली की विकास होतो. वाचन, मनन, चिंतन आणि लेखन या सर्वच बाबी व्यक्तीला सर्वांगाने घडविण्याऱ्या आहेत. असेही त्यांनी सांगितले. संतांनी लिहिलेले साहित्य आपल्यावर उत्तम संस्कार रुजवणारे आहे. आपल्या सभोवतालचे पर्यावरण आपल्यावर प्रभाव टाकते. वाचनामुळे विचारांच्या दिशा स्पष्ट होतात असेही तर म्हणाले. विद्यार्थ्यांनी चांगले वाचन करून समृद्ध व्हावे असे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी मानव्यविद्याशाखेचे उपप्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. विद्या पाटील, डॉ.योगेश महाले, डॉ.विलास धनवे, डॉ. विजय लोहार, डॉ. एल.पी.वाघ, डॉ. अतुल पाटील, प्रा.गोपीचंद धनगर, प्रा.रेणुका झांबरे, प्रा. वर्षा उपाध्ये तसेच इतर प्राध्यापक, श्रोते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वर्षा उपाध्ये यांनी केले.