45 लाखात फसवणुक केल्या प्रकरणी व्ही. डी. पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव, दि. 20 (जनसंवाद न्युज): ‘सीएसआर’ फंड प्राप्त करून शेततळ्याचे काम मिळवून देतो, असा बनाव करीत अजय भागवत बढे यांची ४५ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळत त्यांना ३१ जानेवारीपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून कोट्यवधी रुपयांचे शेततळ्याची कामे केली जातात. या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यापूर्वी निवृत्त वरिष्ठ अभियंता तथा माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अजय बढे यांना शेततळ्याचे कामे मिळवून देतो, असे सांगून त्यांची ४५ लाखांत फसवणूक केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात माजी माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश पवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून व्ही. डी. पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर पाटील यांनी खंडपीठात दाद मागण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती तक्रारदार अजय बढे यांचे वकील धीरज पाटील यांनी दिली.