जळगावशैक्षणिकसांस्कृतिक

शानभाग विद्यालय तर्फे जगद्गुरू श्री संत तुकाराम(तुका झालासे कळस) महानाट्याचे सादरीकरण

जळगाव, दि. 10 (जनसंवाद न्युज): विवेकानंद प्रतिष्ठान ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिवर्षी रंगतरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम विशिष्ट एका विषयावर आधारित भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केला जातो. सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन प्रदर्शनीचे उद्घाटन सकाळ वृत्तपत्र NIE च्यासमन्वयक सौ. हर्षदा नाईक भट यांच्या शुभहस्ते झाले. किल्ले प्रदर्शनीचे उद्घाटन शिवरत्न प्रतिष्ठान अध्यक्ष श्री.जयवर्धन नेवे यांचे शुभहस्ते झाले. चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन सप्तपूट ललित कला चित्रकला महाविद्यालय खिरोदा श्री अतुल मालखेडे व कोमल कांकरिया यांच्या शुभहस्ते झाले. तसेच शानभाग विद्यालय सादरीकरण ज्यामध्ये भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे दर्शन शालेय विद्यार्थी प्रत्यक्षरीत्या रंगमंचावर घडवितात.

हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे. म्हणूनच सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्रबिंदू असलेल्या संत परंपरेचा अनुभव या कार्यक्रमात घेण्यात आला.या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाची पुनरावृत्ती अर्थात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर आधारित एक नेत्रदीपक व अंगावर रोमांच आणणारा संत परंपरेचा कालखंड सागर पार्क मैदान येथे अनुभवला. संत परंपरा या चार दिवसीय महानाट्यातील पहिले पुष्प दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम(तुका झालासे कळस) सादरकर्ते कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय यांनी गुंफले. या नृत्य व नाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 700 विद्यार्थ्यांनी सहभाग यमहानाट्यात घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हणून मा. ह.ब.प. श्री.ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर (जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष), मा.डाॅ.श्री.विवेकजी जोशी (केशव स्मृती प्रतिष्ठान प्रकल्प प्रमुख सेवा वस्ती विभाग) तसेच माजी विद्यार्थी मा.श्री.दर्शन फालक(आर्किटेक्ट) तसेच विवेकानंद प्रतिष्ठान उपाध्यक्षा मा.सौ.हेमाताई अमळकर, शानभाग विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री.विनोदजी पाटील, शानभाग विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. ज्ञानेश्वर पाटील सर, विभाग प्रमुख श्री स्वप्निल पाटील, सौ रुपाली पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुर्यकांत पाटील यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय आणि आभार सौ. अनुराधा देशमुख यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि सदिच्छा भेट देऊन करण्यात आले.

यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पारिवारिक जीवन या प्रसंगाने करण्यात आली. त्यानंतर इंद्रायणीत कर्जखत बुडवणे यानंतर इंद्रायणीत कर्जखत बुडवणे, गावात याचना, शेतराखण, वृक्षतोड प्रसंग,आवली तुकोबा शोध, संवेदनशील तुकोबा, मंबाजी प्रसंग, विठ्ठलाला मज्जाव, पायात काटा रुतणे, शिवबा – तुकोबा भेट, समाज सुधारक तुकोबा, बहिणाबाई प्रसंग, अभंग गाथा बुडवणे, तुकाराम बीज हे प्रसंग नाट्य रूपाने सदर करण्यात आले. तसेच सुंदर ते ध्यान, छुन्नुक छुन्नुक, गोंधळ, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, टाळ बोले चिपळीला, भारुड, भेटी लागे जीवा, पोवाडा, संतकृपा झाली, आनंदाचे डोही आनंदाचे रंग, हेची दान देगा अशा एकापेक्षा एक सुरेल आणि सरस गीतां वरील नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. संत परंपरेतील संतांनी सोसलेले कष्ट, त्याग, आत्मसंयम, त्यांचे कारुण्य, प्राणीमात्रांविषयी समता, भूतदया, ईश्वरावरील निष्ठा, सर्वांच्या हिताविषयी असणारी तळमळ आणि सर्वांमध्ये परमेश्वरास पाहण्याची त्यांची समदृष्टी या संतांनी दिलेल्या शिकवणीतून शालेय विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी हा एकमेव उद्देश यातून साध्य करण्यात आला.

तत्पूर्वी महानाट्याचे संवाद, सुत्रसंचालन माध्यमिक विभागातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी केले. त्यांना सौ.सुरेखा शिवरामे-बाणाईत आणि सौ अनुराधा देशमुख यांनी मार्गदर्शन केले तर वाद्यवृंदा मध्ये गायन वादन हे एकूण 55 विद्यार्थ्यांनी केले. त्यांना विद्यालयाच्या संगीत शिक्षिक श्री. वरूण नेवे, श्री. नकुल सोनवणे, श्री. उमेश सूर्यवंशी आणि श्री. दर्शन गुजराथी यांनी मार्गदर्शन केले या संपूर्ण महानाट्य मध्ये एकूण 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हे विशेष होय. एकूणच सर्व कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरुन असा प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेकानंद प्रतिष्ठान मधील सर्व प्रमुख, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button