जळगावात उद्यापासून हेल्मेट बंधनकारक, जिल्हा पोलिस दलाकडून आदेश

जळगाव, दि. 31 (जनसंवाद न्युज): जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४५१ प्राणांतिक अपघात झाले असून, अपघातात चूक कुणाचीही असो, मृत्युमुखी पडणारे निरापराध दुचाकीस्वारच सर्वाधिक आहेत. मृत झालेल्या वाहनधारकांनी हेल्मेट घातले असते, तर ही मृत्यूंची संख्या निम्म्यावर असती. त्याचप्रमाणे गंभीर जखमी असतानाही प्राण वाचविणे शक्य झाले असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. परिणामी, येणाऱ्या नविन वर्षांत जळगाव शहरातून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय पोलिस दलाने घेतला आहे.
शहरात १ जानेवारी २०२५ पासून हेल्मेटसक्ती नाही, तर गरज म्हणून जळगावकरांनी त्याचा कटाक्षाने वापर करावा, असे प्रयत्न जिल्हा पोलिस दलातर्फे सुरू आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या प्रयत्नातून सर्वांत प्रथम वाहतूक पोलिसांना हेल्मेट वाटप करून हेल्मेट वापरण्याच्या सूचनाही पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिल्या आहेत. १ जानेवारीपासून शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या वाहनधारकांना अडविण्यात येऊन हेल्मेटची विचारणा होणार असल्याचे नियोजन पोलिस दलाने केले आहे.
मागील काही दिवसांत एमआयडीसी, जिल्हापेठ, तालुका आणि रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातांत आठ ते दहा वाहनधारकांचा मृत्यू झाला. त्यात अधिकतर कुटुंबातील कर्ते पुरुष, तर काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वर्षभरात झालेल्या अपघातात सर्वाधिक जीव दुचाकीस्वारांचेच गेले आहेत. परिणामी, हेल्मेट वापरण्याकडे ‘सक्ती’ म्हणून न पाहता एक जबबादारी म्हणून शहरवासीयांनी पाहावे, अशी भूमिका निरीक्षक राहुल गायकवाड यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८८ चे कलम १२९ नुसार, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुचाकी चालविणारा व्यक्ती आणि मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. हेल्मेट परिधान केल्याने ८० टक्के अपघातात वाहनधारकांचा जीव वाचविणे सहज शक्य आहे. परिणामी, १ जानेवारीपासून हेल्मेट बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.