जळगावराजकीय

जळगाव जिल्ह्यातील तीन पराभूत उमेदवारांकडून फेरमतमोजणीची मागणी

जळगाव, दि.1 (जनसंवाद न्युज): विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. या यशावर मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आता संशय व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या तीन पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासाठी त्यांनी आवश्यक ते शुल्कही भरले आहे. मविआ नेत्यांनी ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करून बॅलेटपेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

रोहिणी खडसेंचा आक्षेप

जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ जागा महायुतीने ताब्यात घेतल्या. या निकालावर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही संशय व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अॅड. रोहिणी खडसे यांच्यात लढत झाली होती.

त्यात पाटील यांनी अॅड. खडसे यांचा पराभव केला. निकालावर आक्षेप घेत १६ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठयांच्या सखोल पडताळणीची मागणी अॅड. खडसे यांनी शुक्रवारी (ता. २९) निवडणूक शाखेकडे केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत त्यांनी रीतसर याबाबतची ७ लाख ५५ हजारांची शासकीय फीसुद्धा भरली आहे. विरोधातील उमेदवाराने दोन दिवस आधीच त्यांना कोणत्या बूथवर किती मतदान मिळेल, याबाबतची यादी सोशल मीडियात व्हायरल केली होती आणि त्यानुसारच प्रत्येक बूथवर संबंधित उमेदवाराला मते मिळाली आहेत, हे सगळे संशयास्पद असल्याचे अॅड. रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

डॉ. सतीश पाटलांची तक्रार

एरंडोल मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार डॉ. सतीश पाटील यांनीही ४ ते ५ बूथवरील फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी बूथनिहाय ४५ हजार रुपये शुल्कही त्यांनी भरले आहे. एरंडोल हा मतदारसंघ पूर्वीपासून आमचा बालेकिल्ला राहिला आहे. या निवडणुकीत अगदी आमच्या गावातही आम्ही मायनस कसे राहू शकतो, असा सवाल डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे. ही प्रक्रियाच संशयास्पद वाटत असल्याने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेरमतमोजणीची मागणी केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

वैशाली सूर्यवंशींचा तक्रार अर्ज

पाचोरा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवार वैशाली सूर्यवंशी आणि शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्यातील लढत काठ्याची मानली जात होती. मात्र आमदार पाटील यांनी मोठ्या फरकाने सूर्यवंशी यांचा पराभव केला. त्यामुळे सूर्यवंशी यांनीही निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी केलेल्या या अर्जावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button