
जळगाव, दि.20 (जनसंवाद न्युज): शहरातील राजमालती नगरात मतदारांची नावे शोधून देण्यासाठी लावलेल्या मंडपात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. जुन्या वादाचा वचपा काढत ३६ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मयत सिध्दार्थ वानखेडे याचा घरावर दगडफेक करण्यात आली, जखमींना रुग्णालयात आणल्यावर जिल्हा रुग्णालयातही तुंबळ हाणामारी झाली. सिद्धार्थ माणिक वानखेडे वय 36, रा. राजमालतीनगर, जळगाव असे मृताचे नाव आहे, तर मयत सिध्दार्थ वानखेडेचा शालक विशाल सुरवाडे आणि सासरे अजय सुरवाडे जखमी आहेत त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगाव शहरातील जिल्हा दूध संघामागे राजमालतीनगर आहे. हमाल-मजूर कष्टकऱ्यांचा रहिवास असलेल्या परिसरात मालधक्क्यांवर हमालांचा पुरवठा करण्याचा ठेकेदार असलेला राजू बिस्मिल्ला पटेल याची दहशत असल्याचे बोलले जाते. चार- पाच भावंडांचे मोठे कुटुंब असल्याने त्यांच्या नादाला कोणीही लागत नाही
त्यांचे जुने वाद
मृत सिद्धार्थ वानखेडे कुटुंबातील एकमेव कमावता तरुण होता. पटेलच्या भावंडासोबत सुरवाडे कुटुंबाचे जुने वाद आहेत. काही महिन्यांपूर्वी सुरवाडे कुटुंबियांच्या घरावर झालेल्या हल्ल्या संदर्भात पटेल कुटुंबीयांवर गुन्हा दाखल आहे. या जुन्या वादाची परिणीती विधानसभा निवडणुकीत नव्याने वाद उफाळला. बुधवारी (दि.20) रोजी मतदान असल्याने सकाळी सहापासूनच रहिवासी कॉलन्यांसह मतदान केंद्राबाहेर मंडप उभारून वेगवेगळ्या उमदेवारांचे कार्यकर्ते मतदारांना त्यांच्या याद्यांनुसार नाव, अनुक्रमक्रमांक शोधून चिठ्या देण्यासाठी तयारी करीत असताना, एका बूथ जवळून सिद्धार्थ वानखेडे जात होता. त्यास बघून तेथील युवकांनी खुन्नस दिल्यावरून वादाची ठिणगी पडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
रेल्वे कॅबिनजवळ भाजप कार्यकर्त्यांनी मंडप उभारला होता. तेथे मतदारांच्या चिठ्ठया काढण्याचे कामही सुरू झाले होते. बुद्धविहारजवळ सिद्धार्थचा शालक विशाल सुरवाडे व त्याचे मित्र अपक्ष उमेदवाराचे कार्यकर्ते म्हणून मंडप लावत होते. लॅपटॉपसाठी वीज कनेक्शन मिळविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करीत असताना, सिद्धार्थला मारहाण होत असल्याचा निरोप आला. तत्काळ सर्वच्या सर्व मित्र मंडपाकडे धावत सुटले. तेथे सिद्धार्थ वानखेडे याला पटेल भावंडांसह आठ ते दहा जण खाली पाडून लाकडी दांडक्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असल्याचे घटनेचे प्रत्यक्षदर्शी भिका धुडकू व्याहळे (वय ६५, रा. राजमालतीनगर) यांनी सांगितले.