
जळगाव, दि. 23 (जनसंवाद न्युज): जळगाव येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचालित महिला महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत डॉ.प्रकाश कांबळे यांच्या ‘‘सत्यशोधक समाजाचे क्रांतिकारकत्वं आणि वर्तमानातील वसा व वारसा’ या शोध ग्रंथाचे बोधगया (बिहार) येथे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. प्रस्तुत ग्रंथ महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे क्रांतीकाराकात्व प्रतिपादन करून तो अस्तंगत का झाला याची मीमांसा तर करतोच त्याच बरोबर आपल्या उक्ती आणि कृतीने जोतिबांचा हा क्रांतिकारी वारसा वर्तमानात कोण चालवतो आहे याचीही सर्व पुराव्यानिशी मांडणी केली आहे. बुद्धाचा दार्शनिक संघर्ष, आंबेडकरवादी कोणाला म्हणावे? भारतीय जात व्यवस्था; उत्पत्ती, विकास आणि जातविरोधी आंदोलने, डॉ. गेल ऑम्वेट जमिनीशी आणि सामान्य माणसाच्या हृदयाशी घट्ट नाळ जुळलेली संशोधक अशी एकूण १२ शोध निबंधांची मांडणी या ग्रंथात केलेली आहे.
एकूणच हा शोधग्रंथ परिवर्तनवादी चळवळीला दिशा दिग्दर्शन करणारा असून चळवळीतील कार्यकर्त्यांच्या हातात शस्त्र देणारा तर अभ्यासकांना नवी दृष्टी देणारा ग्रंथ असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले. डॉ. कांबळे यांचा हा दुसरा ग्रंथ असून यापूर्वी ‘अब्राह्मणी योद्ध कॉ. शरद पाटील हा त्यांचा शोधग्रंथ महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशन लोकायतने प्रकाशित केला असून त्यांचा आताचा हा ग्रंथ मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट,पुणे ने प्रकाशित केला आहे. लेखन संशोधना बरोबरच डॉ. कांबळे हे परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय सहभागी असतात.