
जळगाव, दि.७ (जनसंवाद न्युज): विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव व भुसावळ या तालुक्यांत काही ठिकाणी कमी मतदान झाले होते. त्याची कारणे शोधून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 8 ते 19 नोव्हेंबरदरम्यान रांगोळी व मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ज्या गावांत शंभर टक्के मतदान होईल, त्या गावांचा सत्कार करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी रिल मेकिंग स्पर्धाही घेण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषदेच्या सानेगुरुजी सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेला महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहआयुक्त जनार्दन पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे आदी उपस्थित होते. यावेळी जळगाव ग्रामीण व शहरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिका व एन व्ही टेक्नाॅलाॅजी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल मीडियावर तरुणाईसाठी रिल्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 9 ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ६० सेकंदांचा शॉर्ट व्हिडिओ तयार करावयाचा आहे. त्या व्हिडिओमधून मतदान जनजागृतीसाठीचा संदेश असणे आवश्यक आहे. ज्या स्पर्धकांकडे रिल तयार करण्यासाठी तांत्रिक गोष्टींची उपलब्धता नाही, त्यांच्यासाठी एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसतर्फे व्हिडिओनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रोफेशनल साधनांची पूर्तता कोणतेही शुल्क न आकारता करण्यात येणार आहे.
आज पासुन विविध उपक्रमांना सुरूवात
8 ते 19 नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळांमध्ये जनजागृतीपर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी कमी मतदान झालेल्या गावांत गृहभेटी देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ज्या गावांत सर्वाधिक मतदान होईल, अशा गावांची निवड करून तीन गावांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी तयार केलेल्या रिल्स आपल्याच खात्यावर अपलोड करून महापालिका (jcmc.digital) ला टॅग करायचे आहे. यातील विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहेत. त्यात प्रथम बक्षीस 5,001 रुपये, द्वितीय 3,001 रुपये व तृतीय बक्षीस 2,001 रुपयांचे दिले जाणार आहे.