केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, सुरक्षारक्षक सोबत असताना घडला प्रकार

मुक्ताईनगर, दि. 3 (जनसंवाद न्युज): केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेड काढल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. यानंतर आता या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळीत विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी अनिकेत भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता अनिकेत भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी वाद घातला.
मंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी सकाळी आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाणे गाठले. एक मंत्री, खासदाराच्या मुली जेथे सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांचे काय ? असे वारंवार सांगून संताप व्यक्त केला. केंद्रीय मंत्री व खासदार म्हणून नाही तर एक आई म्हणून न्याय मागण्यासाठी आपण पोलिस ठाण्यात आलो आहोत. या संदर्भात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे करणार आहोत. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बोलले आहे, असे त्यांनी सांगितले.
अनिकेत भोई हा शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय उपजिल्हाप्रमुख छोटु भोईचा पुतण्या असल्याचे बोलले जातेय. त्याच्यावर आधीचे चार गुन्हे आहेत.