
जळगाव, दि. 2 (जनसंवाद न्युज): रोटरी क्लब जळगाव तर्फे वृत्तपत्र छायाचित्रकार आणि हौशी छायाचित्रकार यांच्यासाठी आयोजित सर्वोत्तम फोटो स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन शुक्रवार दि. 1 रोजी बळीराम पेठ येथील राजेश यावलकर यांच्या लोक लाईव्ह स्टुडिओ मध्ये करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ छायाचित्रकार पांडुरंग महाले, शब्बीर सय्यद, दत्ता पाटील, संधीपाल वानखेडे, सचिन पाटील, वैभव धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक रोटरी क्लबचे पब्लिक इमेज कमिटी चेअरमन राजेश यावलकर यांनी केले. यावेळी स्पर्धेविषयी झालेल्या चर्चेत रोटरी क्लब जळगावचे मानद सचिव सुभाष अमळनेरकर, प्रोजेक्ट को – चेअरमन सुबोध सराफ, कम्युनिकेशन सेक्रेटरी पंकज व्यवहारे, पराग अग्रवाल, राकेश चव्हाण, माध्यम सल्लागार विजय डोहोळे आणि उल्हास सुतार यांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा दोन स्वतंत्र गटात असून वृत्तपत्र छायाचित्रकारांसाठी असलेल्या गटात दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक वारसा असलेले छायाचित्र तर हौशी छायाचित्रकार गटासाठी ऐतिहासिक समृद्ध वारसा सांगणारे छायाचित्र अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती, वृत्तपत्र छायाचित्रकार, पत्रकार यात सहभागी होऊ शकतात. सांस्कृतिक, ऐतिहासिक, ग्रामीण, धार्मिक, स्थापत्य, सामाजिक, खाद्य संस्कृती यापैकी कोणत्याही स्वरूपातील जिल्ह्याच्या किंवा समाजाच्या वारसाचे दर्शन घडविणारे छायाचित्र असावे.
प्रत्येक स्पर्धक कितीही छायाचित्र पाठवू शकतात. छायाचित्र १२ बाय १८ आकाराची प्रिंट असावी. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याची अंतिम दि. १० ऑगस्ट असून ११ ते १३ ऑगस्ट निवड प्रक्रिया होणार आहे. १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान रिंगरोडवरील पी.एन.गाडगीळ कला दालनात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून २२ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम, माहिती आणि छायाचित्र पाठविण्यासाठी प्रदीप खिवसरा, ३१८ गोलाणी मार्केट हनुमान मंदिरा शेजारी जळगाव, राजेश यावलकर, २२० तहसील कार्यालयासमोरील गल्ली जळगाव,असिफ मेमन ४९ ईदगाह कॉम्प्लेक्स अजिंठा रोड जळगाव
यापैकी कोणत्याही एका ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे.