
जळगाव, दि. 24 (जनसंवाद न्युज): माहिती अधिकार कायदा 2005 च्या 20 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा उत्सव आणि सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यासाठी, जळगाव शहरात भव्य माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे आणि प्रशासकीय पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिपक कुमार गुप्ता यांनी कळवले आहे.
कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण:
हा कार्यक्रम 26 जुन 2025 रोजी ला.ना.शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात दुपारी 4 ते 8 या वेळेत संपन्न होणार आहे. हि कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असून नाव नोंदणी कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आरटीआय ट्रेनर व सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार पी. गुप्ता यांनी केले असून सहआयोजक जवान फाउंडेशन जळगाव हे आहेत.
15 जून 2005 रोजी हा कायदा देशभर लागू झाला. या कायद्याने सामान्य नागरिकांना प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा आणि भ्रष्टाचाराला आव्हान देण्याचा अधिकार दिला. आज, 20 वर्षांनंतर, RTI ने लाखो नागरिकांना सक्षम केले आहे आणि प्रशासनाला अधिक जबाबदार बनवले आहे. मात्र, 20 वर्षे पूर्ण होऊनही हा कायदा अजूनही सामान्य नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही. अनेकदा जनमाहिती अधिकारी स्वतःच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रमात असतात, ज्यामुळे माहिती मिळवण्यात अडचणी येतात. याच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि नागरिकांना सक्षम करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करणारे मान्यवर:
श्री. नितीन विजय पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक, यशदा, पुणे
विषय: माहिती अधिकार कायद्याची प्रशासकीय अंमलबजावणी
श्री. विजय कुंभार, प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ते, पुणे
विषय: सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून माहिती अधिकार कायद्याचा प्रभाव आणि महत्त्व
परिचय: ‘आरटीआय कट्टा’च्या माध्यमातून जनजागृती आणि पारदर्शक प्रशासनासाठी कार्यरत.
श्री. विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते, पुणे
विषय: माहिती अधिकार कायदा: योग्य वापर
परिचय: ‘सजग नागरिक मंच’द्वारे पारदर्शकता आणि जबाबदार प्रशासनासाठी समर्पित.
सहभाग: जळगाव महानगरपालिका, जळगाव जिल्हा पोलिस विभाग, आणि जळगाव जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालये यांचे जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक.
विशेष सत्र: प्रश्नोत्तरे आणि चर्चा सत्र, ज्याद्वारे उपस्थितांना माहिती अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन मिळेल.
कार्यक्रमाचा उद्देश:
माहिती अधिकार कायद्याच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणे.
सामान्य नागरिकांना त्यांच्या माहितीच्या हक्काबाबत सक्षम करणे.
प्रशासकीय पारदर्शकता आणि जबाबदारीला चालना देणे.