जळगावताज्या बातम्या

‘फ्लाय९१’ या प्रादेशिक विमान कंपनी तर्फे पावसाळी प्रवासात बचत! २० मार्गांवर विशेष सवलत

पणजी, दि. ३१ (जनसंवाद न्युज): गोवास्थित ‘फ्लाय९१’ या प्रादेशिक विमान कंपनीने पावसाळ्यानिमित्त प्रवाशांसाठी एक विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. या ‘मॉन्सून ऑफर’ कंपनीच्या २० मार्गांवर ₹३०० पर्यंत सवलत देण्यात येणार आहे. यामध्ये गोव्याला जोडणारे पाच प्रमुख मार्गही समाविष्ट आहेत.

ही ऑफर केवळ १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू असेल, आणि त्या तिकिटांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवास करता येईल.

गोवा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच गोव्यातील पर्यटन आणि प्रवासी व्यवसायाशी संबंधित घटकांसोबत घेतलेल्या बैठकीत, पावसाळी हंगामात गोव्यातील पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी विमान कंपन्या आणि ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फ्लाय९१ या विमान कंपनीने खास सवलतीची योजना जाहीर केली आहे.

ही सवलत गोवा (GOX) येथून हैदराबाद (HYD), जळगाव (JLG), अगत्ती (AGX), पुणे (PNQ), सिंधुदुर्ग (SDW) आणि सोलापूर (SSE) या मार्गांवर लागू होईल. याशिवाय पुणे–सिंधुदुर्ग, बेंगळुरू–सिंधुदुर्ग, हैदराबाद–सिंधुदुर्ग, जळगाव–हैदराबाद, जळगाव–पुणे आणि गोवा–सोलापूर या मार्गांवर देखील ही ऑफर लागू होणार आहे.

“पावसाळ्यात पर्यटनसंख्या कमी होत असल्याने, या काळात प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत ही योजना आखली आहे,” असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.

फ्लाय९१ ही गोवा स्थित विमान सेवा असून, सध्या पुणे, हैदराबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि लक्षद्वीपातील अगत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर नियमित उड्डाणे चालवते. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (GOX) वरून कार्यरत असलेली ही सेवा, एटीआर ७२-६०० प्रकारच्या अत्याधुनिक विमानांनी प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देते. पुढील पाच वर्षांत, फ्लाय९१ देशभरात ५० हून अधिक शहरांशी कनेक्ट होण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयासह प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच, शेवटच्या टप्प्यांतील भागांमध्येही कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button