संत ज्ञानेश्वर विद्यालयातर्फे शाळाबाह्य मुलांना मोफत शिक्षण आणि गणवेश
शाळा व्यवस्थापन समिती सभेत महत्त्वपूर्ण निर्णय

जळगाव, दि.2 (जनसंवाद न्युज): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तर्फे शिक्षण हक्क कायद्यानुसार समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार शाळेच्या परिसरातील सर्व मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सभेमध्ये शाळाबाह्य मुलांना मोफत गणवेश , मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. शाळाबाह्य मुलांना अनेक खासगी शाळा प्रवेश देण्यास नकार देतात. पण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांनी सरकारी नियमांचा आधार घेत मुख्याध्यापकांशी चर्चा करून मुलांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर केला. अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांना समाजसेवेची आवड असल्याकारणाने आपल्या मुलांप्रमाणे रस्त्यावरील मुलांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी शाळाबाह्य मुक्त परिसर मोहीम राबविण्याचा निर्णय सभेमध्ये मांडला. शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून त्यांनी शाळाबाह्य मुले शोधण्याचे कार्य सुरू केले आहे. सदर शाळाबाह्य मुक्त परिसर मोहीम दिनांक 2 ते 15 मे दरम्यान राहील. शाळेच्या कार्यालयात सकाळी 09 ते 11 या वेळेस संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले आहे.