कोल्हे विद्यालयाचा सुयोग सोनवणे ची महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये निवड

जळगांव, दि. 27 (जनसंवाद न्युज): जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन व कैलास क्रीडा मंडळ, जळगाव चा खेळाडू सुयोग दिनेश सोनवणे याची अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने ३४ वी किशोर-किशोरी गट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोघं संघ जाहिर करण्यात आलेले असून त्यामध्ये संबंधित सुयोग सोनवणे याची निवड करण्यात आलेली आहे.
सुयोग सोनवणे हा काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव चा विद्यार्थी आहे. बिहार गया येथे जी.डी. गोयंका पब्लीक स्कुल रसलपूर येथे मॅट वर सदरील कबड्डी सामने घेण्यात येणार आहे. नुकताच मनमाड-नाशिक येथे झालेल्या किशोर-किशोर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला असून मनमाड येथे सराव करीत आहे. निवड झालेला संघ हा मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरुन रात्री स्पर्धेकरिता रवाना होणार आहे. या संघाच्या निवड समितीमध्ये जळगाव चे श्री. सुनिल राणे (सर) यांनी काम पाहिले.
निवड झालेला संघ :- आर्यन पवार (परभणी), तुकाराम दिवटे (जालना), सारंग उंडे (नंदुरबार), मनिष काळजे (पिंपरी चिंचवड), किशोर जगताप (परभणी), विश्वजीत सुपेकर (धाराशिव), ऋतुराज महानवर (पिंपरी चिंचवड), श्रेयस लाले (रत्नागिरी), निखील गायकर (ठाणे ग्रामीण), समर्थ ठोंबरे (कोल्हापूर) सुयोग सोनवणे (जळगांव), किरण कोळी (पुणे शहर) या संघासाठी संघ प्रशिक्षक श्री. संग्राम मोहिते, (धाराशिव), तर संघ व्यवस्थापक श्री. वाल्मिक बागुल (मनमाड) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
निवड झालेल्या खेळाडूला जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मोहनराव भावसार, कार्याध्यक्ष श्री. शामभाऊ कोगटा, सरकार्यवाह श्री. नितीन बरडे, खजिनदार श्री. सुनिल राणे, तसेच कैलास मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद तायडे, कार्याध्यक्ष श्री. अमित काळे, का. ऊ. कोल्हे विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. एस. जी. खडके सर आदिंनी अभिनंदन केलेले आहे. सदर खेळाडूस श्री. कमलेश पाटील व श्री. योगेश बारी यांचे मार्गदर्शन लाभले.