
जळगाव, दि.15 (जनसंवाद न्युज): श्रमण संघीय उपाध्याय प्रवर प.पू.प्रवीण ऋषीजी म.सा. होळी चातुर्मासानिमित्त जळगावात उपस्थित आहेत. त्यांच्या सान्निध्यात शहरातील स्वाध्याय भवन येथे श्रमण संघाचे जळगाव जिल्हास्तरीय अधिवेशन होऊन त्यात अध्यक्षपदी जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अशोक जैन यांची निवड करण्यात आली.
जळगाव जिल्ह्याच्या श्रमण संघ अध्यक्षपदी अशोक जैन यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात येऊन तशी घोषणा अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री, संघाचे ज्येष्ठ आधारस्तंभ सुरेशदादा जैन यांनी केली.
श्रमण संघ कार्याचा गौरव
आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी श्रमण संघाच्या आणि एकूणच सर्व मान्यता, परंपरा यांना एका मंचावर आणण्यासाठी तसेच धर्मोन्नतीसाठी आयुष्य वेचले. “जैन आगम”, “जैन दर्शन” लोकांपर्यंत सोप्या भाषेत अशोक जैन पोहोचविले. त्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या मोठ्या आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या “श्रमण संघ” या परंपरेचे सदस्य असल्याचा आम्हास गौरव असला पाहिजे, असे प्रतिपादन केले. जळगाव श्री संघाचा व वर्षीतप पारणा व्यवस्थेचा गौरव करण्यात आला.
अधिवेशनाचे प्रास्ताविक अशोक जैन यांनी केले. संघ एकतेसाठी चर्चा होऊन ठराव पारीत करण्यात आले. आशीर्वादपर भावना संघपती दलुभाऊ जैन यांनी व्यक्त केल्या.
पुण्याहून आनंद तीर्थचे अध्यक्ष सतीश सुराणा, सुभाष मुथा यांनी चिचोंडी-अहिल्यानगर येथे साकारत असलेल्या “आनंदतीर्थ” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. ‘गुरु आनंद दीक्षा मंत्र’ प्रदान करण्यात आला. गुरु आनंद यांची प्रतिमा कोठारी परिवारातर्फे देण्यात आली. सीए अनिल कोठारी यांनी सूत्रसंचालन केले तर सुरेंद्र नथमल लुंकड यांनी आभार मानले. गौतम प्रसादी भोजन व्यवस्था, भवरलाल आणि कांताबाई जैन परिवारातर्फे करण्यात आले.