
जळगाव, दि. १२ (जनसंवाद न्युज): जळगाव खुर्द गावाजवळ उड्डाणपुलाजवळील बांधकामाच्या ठिकाणी उत्तर प्रदेशमधील तिघा मजुरांचा अज्ञात वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याचे मंगळवारी दि. 11 ला सकाळी उघडकीस आले होते. या अपघाताला कारणीभूत डंपरचालकाला नशिराबाद पोलिसांनी शिताफीने अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रात्री गौण खनिज वाहतूक बंद असताना, पहाटे चारच्या सुमारास मुरूम आणणाऱ्या डंपरखाली चिरडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक चौदा वर्षाचा मजूर असल्याचे उघडकीस आले आहे. अपघाताला कारणीभूत डंपरचालक प्रकाश सुदामाकुमार पटेल (वय २३, रा. उफरवली, पो. कोदोरा, ता. सियाबल, जि. सिंधी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल, समांतर रस्ते आणि रस्त्याच्या कडेला ड्रेनेज सिस्टिमची कामे सुरू असून, ड्रेनेजच्या कामात स्लॅब टाकण्याचे काम सोमवारी दि.10 ला रात्री आठपर्यंत सुरू होते. काही मजूर त्यांच्या तात्पुरत्या राहण्याच्या ठिकाणी निघून गेले. मात्र, तिघे मजुरांचे जेवण आटोपले आणि झोपण्यासाठी जागा सुरक्षित असल्याचे पाहून तेथेच तिघेही प्लॅस्टिक शीट टाकून झोपले. दिवस उजाडला तेव्हा तिघांचे मृतदेह पाहून कामावर आलेल्या मजुरांना धक्काच बसला.
होळीसाठी जाणार होते गावी
उत्तर प्रदेश-बिहार येथे होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या कामाच्या ठिकाणी कार्यरत काही मजूर अगोदरच आपापल्या गावी निघून गेले होते. या तिघांना रेल्वे तिकीट नंतरचे भेटल्याने तिघे आजचे काम आटोपून होळी साजरी करण्यासाठी गावाकडे निघणार होते. मात्र, दिवस उजाडण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. तिघांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाईक कुटुंबीय मूळ गावातून निघाले असून, ते ऐन होळीच्याच दिवशी जळगावात पोहोचतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
एक मजूर अल्पवयीन
मृतांमध्ये १४ वर्षीय योगेश कुमार राजबहादूर (रा. सीढपुरा ता. कासगंज, जि. पटियाली) याच्यासह शैलेंद्रसिंग नथूसिंग राजपूत, भूपेंद्र मिथीलाल राजपूत (दोन्ही रा. दलेलपूर, ता. जि. विटा, उत्तर प्रदेश) यांचा समावेश असून, नशिराबाद पोलिसांत दाखल गुन्ह्यात ठेकेदाराविरुद्ध बालमजुरास कामावर लावल्याप्रकरणी वाढीव कलमांचा समावेश करण्यात येणार आहे.
सीसीटीव्हीत डंपर दिसले
तपास केल्यानंतर हे वाहन मुरुमाने भरलेले डंपर (एमएच १९, सीवाय ३१९१) असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासाठी सीसीटीव्ही आणि कामाच्या ठिकाणी ये-जा असणाऱ्या मजुरांसह वाहनधारकांची सलग चौकशी केल्यानंतर कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते. मात्र, ओरिएंट सिमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेरात पहाटे पाचला डंपर जाताना आढळून आले. त्याचा मागमूस घेत डंपरचालकाला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.क
यांनी लावला तपास
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ए. सी. मनोरे, पोलिस नाईक उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, जावेद शहा, राहुल वानखेडे, अतुल लक्ष्मण महाजन यांनी गुन्ह्याचा उलगडा करून संशयित डंपरचालकाला अटक केली. संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.