
जळगाव, दि.5 (जनसंवाद न्युज): भादली शिवारात हरभरा काढण्याचे काम सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने पाच जण जखमी झाले असून त्यातील एक गंभीर जखमी आहे. गंभीर जखमीला जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की बुधवारी सकाळी भादली शिवारात हरबरा काढण्याचे काम सुरू होते. आठ ते नऊ जण काम करत असताना अचानक मधमाशांचा जथ्था आला आणि दिसेल त्याला त्या मधमाशा चावत सुटल्या. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. त्यातील भागवत ज्ञानदेव खाचणे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना चेहर्यावर आणि हाताला मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतला आहे. दोन ते चार मधमाशा कानात गेल्या होत्या. भादली ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. भागवत ज्ञानदेव खाचणे, रेखा प्रेमचंद अत्तरदे, सारिका रुपेश भंगाळे, शोभा नारायण झोपे, रूपेश सुधाकर भंगाळे अशी जखमींची नावे असून काहींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.