शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यालय अधीक्षक नरेंद्र वाघ सेवानिवृत्त

जळगाव, दि. 31 (जनसंवाद न्युज): येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कार्यालय अधीक्षक नरेंद्र काशिनाथ वाघ हे शुक्रवारी दि. ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी शाल, पुष्पगुच्छ व विठूमाऊलीची मूर्ती देऊन सन्मान केला.
नरेंद्र वाघ यांनी ३३ वर्षे शासकीय सेवा केली. या सेवेत त्यांनी अत्यंत मनमिळाऊपणे, कुशलतेने व सचोटीने दिलेले प्रत्येक कार्य वेळेत पूर्ण केले आहे. सध्या ते लेखा विभागात कार्यालय अधीक्षक म्हणून सेवा देत होते. त्यांच्या दीर्घ सेवेबाबत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सन्मान केला. नरेंद्र वाघ यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजात अत्यंत पारदर्शीपणे सेवा देऊन संस्थेचे नाव उंचावले असे यावेळी अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे (महाविद्यालय), संजय चौधरी (रुग्णालय) यांचेसह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.